लक्षवेधी मांडली अन् तात्काळ यंत्रणा हालली..! आ. अतुल भोसलेंच्या 'लक्षवेधी'नंतर डी.पी. जैन व अदानी समूहाच्या वरिष्ठांकडून पाहणी; महामार्गाच्या कामाला मिळणार गती


लक्षवेधी मांडली अन् तात्काळ यंत्रणा हालली..!

आ. अतुल भोसलेंच्या 'लक्षवेधी'नंतर डी.पी. जैन व अदानी समूहाच्या वरिष्ठांकडून पाहणी; महामार्गाच्या कामाला मिळणार गती

कराड : - पुणे–बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाचे काम तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या अर्धवट कामामुळे १०० हून अधिक अपघात झाले असून ५४ नागरिकांचा जीव गेला आहे. याबाबत कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांनी  थेट विधानसभेत लक्षवेधी मांडत सभागृहाचे लक्ष वेधले. याचे तात्काळ परिणामही दिसण्यास सुरुवात झाली असून लक्षवेधीनंतर लगेचच या अपुऱ्या व अर्धवट कामाची डी.पी. जैन व आदानी कंपनीच्या वरिष्ठांनी कराडला येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. 

बुधवारी येथील पुणे बेंगलोर महामार्गावर कराड ते नांदलापूर सुरू असलेल्या सहपदरी उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी डी पी जैन कंपनीचे चेअरमन दीपक जैन व आदानी कंपनीचे सीइओ के पी माहेश्वरी यांनी केली. नांदलापूर येथे उड्डाणपुलाच्या भरावाचे तसेच उड्डाण पुलावर सुरू असलेले कामाची पाहणी त्यांनी केली. कराड मलकापूर मधून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे मात्र भरावाच्या कामाला अतिक्रमणाचा अडसर कोल्हापूर नाक्यावर आहे. कोल्हापूरला नाका ते कोयना पूल उड्डाणपूलाच्या भरावासाठी सध्या दोन्ही बाजूने सुरू असलेल्या कामाची देखील पाहणी यावेळी करण्यात आली. महामार्गाची रखडलेली कामे ही जलद योग्यरितीने करावेत अशा सूचना अदानी व डी.पी. जैन कंपनीने दिल्या. यावेळी प्रत्यक्ष कामांमधील अधिकारी, इंजिनियर यांची उपस्थिती होती.

महामार्गाच्या संथ कामामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी रोखण्यासाठी आ. अतुल भोसले यांनी विधानसभेत शासनाला जाब विचारला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे यंत्रणा खडबडून जागी झाली. लक्षवेधी सूचनेनंतर तात्काळ यंत्रणा हालली. आमदार अतुल भोसले यांनी विधानसभेत उठवलेल्या आवाजामुळे तीन वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामाला आता वेग येणार आहे.

 कोल्हापूर नाक्यावर अतिक्रमणाचा अडसर

कराड ते नांदलापूर दरम्यान उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नंदला पूर्व कोल्हापूर नाका येथे भराव पुलाचे काम बाकी आहे. कोल्हापूर नाका येथे असणाऱ्या अतिक्रमणामुळे उडण पुलाच्या भराव पुलासह अनेक कामे रखडले असल्याचे अधिकारी इंजिनिअर यांनी डीपी जैन व अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.  याची सविस्तर माहिती घेऊन येथील कामे मार्गी लावण्याच्या सूचनाही अधिकारी व इंजिनिअर यांना देण्यात आल्या आहेत.

पुणे –बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांचे काम अर्धवट व संथ सुरू आहे. १०० हून अधिक अपघातांत सुमारे ५४ नागरिकांचा जीव गेला आहे. हा महामार्ग अपघातांचा सापळा ठरत असल्याची गंभीर बाब मी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दखल घेत कामांमध्ये तात्काळ सुधारणा करून महामार्गाची कामे जलद गतीने पूर्ण करण्यातबाबत सकारात्मकता दाखवली. अदानी समूह व डीपी यांच्या वरिष्ठांनी प्रत्यक्ष साईट विजिट करत येथील इंजिनिअर व अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे रखडलेल्या महामार्गाच्या कामाला गती निश्चित मिळेल. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधील आहे. भविष्यातही लोकांचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न राहतील.

- आमदार डॉ. अतुलबाबा भोसले

Post a Comment

0 Comments