कराडला 'भल्या भल्यांच्या झाल्या बत्या गुल्ल'..! इच्छुकांचा भ्रमनिरास; पालिकेत 31 पैकी 16 जागांवर महिलाराज; राजकीय हालचालींना वेग

कराड - नगराध्यक्ष आरक्षण सोडतीनंतर येथील पालिकेच्या प्रभागाचे आरक्षण आज निश्चित झाले. या सोडतीमध्ये भल्या भल्यांच्या बत्या गुल झाल्याने त्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. तर दुसरीकडे काहींना नव्याने संधी मिळाल्याने 'कही खुशी कही गम' चे चित्र आहे. या आरक्षण सोडतीत ३१ जागांपैकी तब्बल १६ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने पालिकेत पुढील पाच वर्ष महिलांचा दबदबा पहावयास मिळणार आहे. काही ठिकाणी इच्छुक जास्त व तगडे असल्याने बऱ्याच ठिकाणी चुरशीच्या लढाया पहावयास मिळणार आहे.

 १५ प्रभागांसाठी आरक्षण आज निश्चित झाले. यात नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ८ जागा, तर अनुसूचित जातींसाठी ४ जागा राखीव झाल्या आहेत. महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी १० तर उर्वरित 9 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या झाल्या आहेत. यातील काही प्रभाग हे आरक्षित झाल्याने त्या प्रभागांमध्ये तयारी केलेल्या भावी नगरसेवकांचा चांगलाच भ्रमनिरास झाला. प्रभाग १मध्ये माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने यांचा पत्ता कट झाला आहे. प्रभाग ४ हा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने येथून इच्छुक असणाऱ्या रणजीत पाटील, जयवंत पाटील, प्रीतम यादव, रमेश मोहिते चांगलाच भ्रमनिरास झाला. प्रभाग ६ मध्ये शेखर बर्गे, वैभव माने यांनी देखील चांगली तयारी केली होती मात्र यांचाही भ्रमनिरास झाला. महत्त्वाचा प्रभाग असणाऱ्य
प्रभाग ५ मध्ये अशोक पाटील, सुरेश पाटील, प्रमोद पाटील हे शड्डू ठोकून मैदानामध्ये उतरण्यास तयार होते मात्र येथे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण पडल्याने यांनाही आपल्या तलवारी मॅन कराव्या लागणार आहेत.  शहरातील चर्चित प्रभाग ८ मध्ये माजी नगरसेवक अतुल शिंदे, युवा नेते हर्षवर्धन डुबल, विजय डुबल, आशुतोष डुबल यांनीही मोठी तयारी केली होती. काहीही करून यंदा पुढच्या दाराने नगरपालिकेत जायचेच असा चंगच यांनी बांधला होता. मात्र येथे नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने या चौघांनाही माघार घ्यावी लागणार आहे. प्रभाग १० मध्ये यंदा काही करून आपणच नगरसेवक व्हायचं या इरेला पेटलेल्या ओंकार मुळे यांनाही आरक्षणाने हुलकावणी दिली. प्रभाग १५ मध्ये राहुल खराडे यांनी देखील तयार केली होती मात्र तेथेही अपेक्षित आरक्षण पडल्याने त्यांना माघार घ्यावी लागणार आहे.
एका बाजूला इच्छुकांच्या दांड्या गुल झाल्या असल्या तरी दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी प्रचंड चुरशीच्या लढती होणार आहेत. त्यामध्ये प्रभाग २ मध्ये लोकशाही आघाडीचे गटनेते व माजी नगरसेवक सौरभ पाटील व सुहास पवार यांच्यामध्ये योग्य अंडरस्टँडिंग न झाल्यास संघर्ष पहावयास मिळेल आणि प्रभाग ४ आरक्षित झाल्यानंतर जवळचा व सोयीचा प्रभाग म्हणून प्रभाग २ मध्ये जयवंत पाटील, रणजीत पाटील हेदेखील नशीब आजमाऊ शकतात. त्यामुळे ही लढत प्रचंड चुरशीची होणार आहे. प्रभाग ३ मध्ये साहेबराव शेवाळे, प्रवीण पवार, शिवराज इंगवले यांनी तयारी केल्याने येथेही चुरशीचा सामना पहावयास मिळेल. प्रभाग ५ मध्ये माजी नगरसेविका अरुणा सुरेश पाटील, अर्चना अशोकराव पाटील, सारिका प्रमोद पाटील या महिला उमेदवार इच्छुक असल्याने याही प्रभागाकडे लक्ष असणार आहे. प्रभाग क्रमांक सात मध्ये सुहास जगताप, अजय पावसकर व दीपक पाटील यांच्यामध्ये उमेदवार निश्चिती वेळी सामंजस्यपणाची भूमिका न घेतल्यास येथेही संघर्ष पाहायला मिळेल. प्रभाग ९ मध्ये माजी बांधकाम सभापती हनुमंत पवार, पोपटराव साळुंखे, आशुतोष जाधव व फारूक पटवेकर यांनीही षडू ठोकला आहे. त्यामुळे ही लढतही लक्षवेधी ठरेल. प्रभाग १० मध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब यादव, विक्रम भोपते, विनोद ढेब, समाधान चव्हाण, सचिन पवार आदी इच्छुक असल्याने येथेही चुरस पाहायला मिळेल. प्रभाग क्रमांक 15 मध्ये माजी नगरसेवक सुहास आंबेकरी यांना टक्कर देण्यासाठी त्याच प्रभागातील अखिल आंबेकरी यांनी दंड थोपटले आहेत. ही लढत देखील पाहाण्यासारखी असणारआहे. 

चौकट

राजकीय धक्के सोमवारपासून

नगराध्यक्ष, प्रभाग आरक्षणसोडती नंतर आता पालिकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आरक्षण निश्चितीनंतर आता बुद्धिबळाचा डाव आंथरण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी या सत्तेच्या सारीपाटावर एक खेळी करून धक्का दिला जाणार आहे. काही माजी नगरसेवक व त्यांचे पदाधिकारी 'कमळ' घेऊन या सत्तेच्या सारीपाठात सोमवारी आपले स्थान निश्चित करणार आहेत. हे करताना 'कॅप्टन' केंद्रस्थानी असणार आहे.

चौकट
असे आहे आरक्षण

 प्रभाग क्रमांक : १ अ - सर्वसाधारण महिला,  ब -ओबीसी. प्रभाग क्रमांक: २ अ - सर्वसाधारण महिला,  ब- खुला, प्रभाग क्रमांक : ३ अ- सर्वसाधारण महिला, ब-खुला. प्रभाग क्रमांक : ४ अ- सर्वसाधारण महिला,  ब-अनुसूचित जाती. प्रभाग क्रमांक : ५ अ- सर्वसाधारण महिला, ब-अनुसूचित जाती.  
 प्रभाग क्रमांक : ६ अ- सर्वसाधारण महिला, ब-ओबीसी. प्रभाग क्रमांक : ७ अ-ओबीसी महिला, ब-खुला. प्रभाग क्रमांक : ८ अ- सर्वसाधारण महिला, ब-ओबीसी. प्रभाग क्रमांक : ९ अ- सर्वसाधारण महिला, ब- खुला. प्रभाग क्रमांक : १० अ-ओबीसी महिला,  ब- खुला. प्रभाग क्रमांक : ११ अ-अनुसूचित जाती महिला,  ब-खुला. प्रभाग क्रमांक : १२ अ- सर्वसाधारण महिला, ब- खुला. प्रभाग क्रमांक : १३ अ-ओबीसी महिला, ब- खुला. प्रभाग क्रमांक : १४ अ-ओबीसी महिला, ब- खुला. प्रभाग क्रमांक : १५ अ-अनुसूचित जाती महिला,ब-ओबीसी, क- सर्वसाधारण महिला

Post a Comment

0 Comments