माजी नगरसेवकांना कमळाचा लळा; कराडला आघाडीच्या पोटातच गोळा..! कारण राजकारण : राजेंद्र यादव यांना धक्का; जिल्हाध्यक्ष म्हणे... ही तर 'झांकी' पिक्चर अभी बाकी...

कराड - येथील पालिका आरक्षण निश्चितीनंतर आता मोठ्या हालचालींनी वेग घेतला आहे. या घडामोडीत पहिला फटका यशवंत विकास आघाडीला बसला असून माजी महिला व बालकल्याण सभापती स्मिता हूलवान यांनी 'हाती' 'कमळ' घेतले. त्यांच्या या प्रवेशाने राजेंद्र यादव यांच्या गटाला 'हादरा' बसला असून आजचा पक्ष प्रवेश सोहळा ही एक झलक असून दुसऱ्या टप्यात शहरात आणखी महत्वाचे प्रवेश भाजपमध्ये होतील असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केल्याने यशवंत विकास आघाडीच्या पोटात गोळा उठला आहे. दरम्यान, मुंबई मध्ये आज झालेल्या पक्षप्रवेशात काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने तसेच अपक्ष माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांनीही अधिकृत भाजपात पक्षप्रवेश झाला.

मंगळवारी दुपारी मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक मान्यवरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. हे सर्व प्रवेश आमदार डॉ. अतुल भोसले यांनी घडवून आणले. मुंबईत पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र उर्फ आप्पा माने, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, संजय कांबळे यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करीत रवींद्र चव्हाण यांनी त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. 

कराड नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदासह प्रभाग निहाय आरक्षण मागील आठवड्यामध्ये निश्चित झाले. यामध्ये काही इच्छुकांचे पत्ते कट झाले तर काहींना लॉटरी लागली. कही खुशी कही गमचा माहोल असतानाच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला. गेल्या चार दिवसांपासून काही माजी नगरसेवक भाजपात जाणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. मंगळवारच्या मुहूर्तावर भाजपच्या गळाला तीन माजी नगरसेवक लागले. राजेंद्र उर्फ अप्पा माने आणि इंद्रजीत गुजर यांचे नाव आधीच निश्चित झाले होते. मात्र आज आमदार डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार धक्का देत यशवंत विकास आघाडीलाच गळती लावली. 
नवरात्रीमध्ये दांडिया व गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंनाच प्रवेश अशा आशयाचे फलक काही ठिकाणी लावले होते. या फलकावर स्मिता हुलवान यांचे नाव होते. स्मिता हुलवान यांची बदललेली हिंदुत्वाची भूमिका भाजपा धार्जिन असल्याचे राजकीय जाणकारांनी तेव्हाच 'हेरले' होती. मागील वर्षी जुलैमध्ये कराडचा पाणी प्रश्न पेटला असताना डॉ. अतुल भोसले यांनी पाणीपुरवठ्यासह अन्य सोयी सुविधा पुरवल्या होत्या. या घडामोडीमध्येच यशवंत विकास आघाडीला हादरे बसतील असे प्रचंड वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर संघटना पातळीवर जोरदार हालचाली झाल्या आणि तेव्हा पक्षप्रवेश रोखण्यात आघाडीचे प्रमुखांना यश आले. त्यामुळे जोपर्यंत भाजपचा गळ्यात मफलर पडत नाही, तोवर काही खरं नाही असे राजकीय जाणकारांचे मत होते.
अखेर मंगळवारचा मुहूर्त साधत स्मिता हुलवान यांनी भाजपात उडी घेतली आणि चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. मागील आठवड्यामध्ये स्मिता हुलवान यांनी पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टवर हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना एक तास वेटिंग वर ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुढील बोलणी झाल्यानंतर पक्षप्रवेशाचे तारीख निश्चित झाली आणि त्या मंगळवारी अधिकृत भाजपवासी झाल्या. 

नगरपालिकेच्या हालचाली आता अशाच गतिमान राहणार असून रोज काही ना काही घटना, घडामोडी शहरासाठी नव्या असणार आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवून त्या घडामोडी लोकांपर्यंत सविस्तर पोहोचवण्याचे काम दैनिक पुण्यनगरीकडून करण्यात येणार आहे.


जिल्हाध्यक्षांचे विधान; यशवंत आघाडीच्या पोटात गोळा


मुंबईतील जो पक्ष प्रवेश सोहळा पार पडला ही तर एक झलक असून दुसऱ्या टप्यात शहरात आणखी महत्वाचे प्रवेश भाजपमध्ये होतील. भाजप जिल्हाध्यक्ष आ.अतुल भोसले यांनी पक्षप्रवेशानंतर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानाला  मोठे महत्त्व  प्राप्त झाले असून यशवंत आघाडीसह अन्य आघाडी व पक्ष्यांच्या पोटात गोळा उठला आहे. सुरुवात स्मिता हुलवान यांनी केल्याने या पक्षप्रवेशांचा शेवट कोण करणार याची चर्चा आता कराडच्या चौकाचौकात होऊ लागली आहे.  कुंपणावर बसलेले बरेच माजी नगरसेवकांसह इच्छुक आज झालेल्या पक्षप्रवेशानंतर पटापट उड्या मारण्याच्या शक्यता आता वेग घेतील हे मात्र निश्चित. 


कराडचा सर्वांगीण विकास व्हावा पालिकेतील प्रलंबित प्रश्नांना सहकार्य मिळावे ही भाजपसह महायुतीची भूमिका आहे. सर्वांना बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करणार असून या प्रवेशामुळे कराड परिसरातील भाजपचा जनाधार अधिक मजबूत होईल आणि कराडच्या विकासाला नव्या दिशा मिळेल हा विश्वास आहे. महायुतीकडून शहरातील विकास कामे करून घेऊन शहराचा चेहरा मोहरा ज्यांना बदलायचा आहे त्यांनी महायुतीत सामील व्हावे. काठावरील लोकांना भाजपमध्ये घेणार असून आम्ही महायुतीचे हात बळकट करणार आहोत.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले 
सातारा जिल्हाध्यक्ष, भाजप

Post a Comment

0 Comments