'हात' सोडतो, द्या 'कमळ'; 'पॉवर'साठी 'वळवळ' कराड दक्षिणेतील 'त्या' नेत्याची केविलवाणी अवस्था; पायऱ्या झिजवण्याची वेळ


'हात' सोडतो, द्या 'कमळ'; 'पॉवर'साठी 'वळवळ'

कराड दक्षिणेतील 'त्या' नेत्याची केविलवाणी अवस्था; पायऱ्या झिजवण्याची वेळ

कराड - कधीकधी गावात एकहाती अंमल असलेला कराड दक्षिणेतील 'तो' नेता आज चांगलाच अडगळीत पडला आहे. त्या नेत्यांला 'कमळाचा लळा' लागला आहे. मात्र 'कमळ' घेताना आपली बार्गेनिंग पॉवर वाढावी यासाठी 'तो' नेता धनुष्यबाण व घड्याळवाल्यांच्या देखील पायऱ्या झीजवताना दिसत आहे. गेली काही महिने अस्वस्थ असलेला हा नेता तिन्ही पक्षाच्या संपर्कात स्वतःहून गेला आहे. मात्र अन्य पक्षातून आम्हाला 'पायघड्या' अंथरल्या जात आहेत, असे दाखवत भाजपमध्ये जाताना बार्गेनिग पॉवर वाढवण्यासाठी निरेटिव्ह सेट करताना दिसत आहे. दक्षिणेतील या मोठ्या नेत्यास आज राजकीय पक्षाच्या पायऱ्या झीजवण्याची वेळ आल्याने राजकारणात सत्ता ही 'आळवा वरच पाणी' असून, 'आज आहे उद्या नाही' याची पुन्हा एकदा प्रचिती होते.

कराड दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला. येथे काल परवापर्यंत फक्त 'हात'च दिसत होता. मात्र भाजपच्या डॉ. अतुल भोसले यांनी 'हाता'मध्ये 'कमळ' घेते दक्षिणेच्या पटलावर 'कमळा'ची शेतीच सुरू केले आहे. ते आमदार झाल्यापासून भल्याभल्यांना त्यांनी 'कमळा'चे व्यसन लावले आहे. 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कराड दक्षिण मधून काँग्रेस हद्दपार झाले. यानंतर 'कमळा'ची शेती खरी बहरू लागली. काँग्रेसवाल्यांच्या 'हातात'ही आता 'कमळ' उठून दिसू लागल्याने दक्षिणेतील राहिलीसाहिलेली काँग्रेस हतबल आहे. कराड दक्षिण मधील असाच एक मोठा नेता यालाही 'कमळा'चा लळा लागला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षांतराचा विषय ऐरणीवर होता. त्यानंतर हा विषय वेळ आधीच बाहेर 'लीक' झाल्यानंतर काँग्रेसला धक्काच बसला. त्यानंतर काही दिवसात 'त्या' नेत्याने विकासकामाच्या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे फोटो लावत एकच खळबळ उडवून दिली. मात्र, जोपर्यंत 'त्या' नेत्याचा अन्य पक्षात प्रवेश होत नाही, तोपर्यंत कोणतीही भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आलेले नाही. मात्र 'त्या' नेत्याचे काँग्रेसला 'हात' दाखवण्याची शक्यता गृहीत धरून 'काँग्रेस'नेही त्यांना चार 'हात' लांबच ठेवले आहे. 'तो' नेता भाजपत येण्याची शक्यता असल्याने त्या नेत्यांशी फरकत घेऊन त्यांचे जुने सहकारी विधानसभेच्या आधीच भाजपवासी झाले होते. 'सासूसाठी वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली' अशी भीती असल्याने त्या नेत्याला पक्षात घेऊ नये अशी आर्जव जुने सहकारी वरिष्ठांकडे आजही करत आहेत.

 आठ दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पुन्हा 'त्या' नेत्याकडून राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्या नेत्याची वैयक्तिक एक दोन कामे शासकीय पातळीवर अडकलेली असून ती फक्त कमळवालेच पूर्ण करू शकतात, हा विश्वास देखील त्या नेत्याला यापूर्वीच आला आहे. असे असले तरी शिंदे गट माझ्या पक्षप्रवेशासाठी अतुर आहे. 'घड्याळ' वाले ही माझ्यासाठी पायघड्या अंथरूण तयार आहेत. अशा आशयाचा नेरेटिव्ह सेट करण्याचे काम त्या नेत्यासह त्याच्या बगलबच्चाकडून सुरू आहे. एका बाजूला शिंदे व अजित पवार गटामध्ये आम्हाला मागणी आहे असे नेरेटिव्ह सेट करायचे आणि दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये जायच्या आधी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून पदरात जास्त पाडून घ्यायचे ही चाल या नेत्यांकडून छुप्या पद्धतीने चालवली जात आहे. मुळात एकनाथ शिंदे गट असो व अजित पवार गट यांच्याकडून स्वतः या नेत्याला घेण्याच्या चर्चा झालेल्या नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र या दोन पक्षातील नेते आम्हाला पक्षात घेण्यासाठी आतुर आहेत असे दाखवायचे, म्हणजे 'हातात' 'कमळ'  घेताना आपली बार्गेनिंग पावर वाढेल याची पुरेपूर काळजी संबंधित नेता घेताना दिसत आहे.


'पायघड्या' घातल्या जात असल्याचे निरेटिव्ह सेट 

 शिंदे गट व अजित पवार गटाकडून त्या नेत्याला 'पायघड्या' घातल्या जात असल्याचे निरेटिव्ह सेट आहे. मात्र जरी पायघड्या घातल्या असतील तर इतके दिवस त्या पक्षांच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ या नेत्याच्यावर का आली? हा एक प्रश्न आहे. नाहीतर  चार दिवसांपूर्वीच या नेत्याने मुंबईत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. त्या नेत्याला  एक दोन अडचणीतील कामे ही करून घ्यायची असून यासह त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे राजकीय पुनर्वसन ही करायचे आहे. आणि हे फक्त भाजपमध्ये गेल्यावरच शक्य आहे. हे त्या नेत्याने ओळखले आहे.  त्या पक्षात आपले महत्त्व वाढावे यासाठी चाललेला खटाटोप राजकीय जाणकारांसह कराड दक्षिणमधील नागरिकांपासून लपून राहिलेला नाही.

Post a Comment

0 Comments