कराड : - कराड नगरपालिकेचे राजकीय वातावरण चांगले ढवळून निघू लागले आहे. नगराध्यक्ष सोडत, प्रभाग आरक्षण निश्चितीनंतर पालिकेतील राजकारणाने प्रचंड वेग घेतला आहे. यामध्ये कराडला भाजप चांगलेच जोमात दिसत आहे. मंगळवारी भाजपने विरोधकांना आणखी एक 'धक्का' देत त्यांचे 'मोहरे' गळाला लावले आहेत. माजी सहकारमंत्र्यांचा 'मोहरा'ही पालिका निवडणुकीच्या आधी 'हेरला'. या घडामोडीनंतर तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यातील जिल्हा बँक व आमदारकीचा 'पैरा' फिटल्याचे हा भाजपप्रवेश द्योतक मानला जात आहे. दरम्यान, येथील नगरपालिकेतील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जनशक्ती आघाडीचा झालेला बहुचर्चित भाजप प्रवेश हा देखील काँग्रेस व राष्ट्रवादीला विचार करायला लावणारा आहे.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये तत्कालीन आमदार बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यात लढत झाली. या लढतीनंतर बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यात राजकीय 'वैर' सुरू झाले. त्यानंतर जसा काळ लोटत गेला तसतसे राजकीय विरोधाची धार बोथट झाली. कारण 2014 नंतर डॉ. अतुल भोसले यांचे राजकीय विरोधक पृथ्वीराज चव्हाण हे समोर आले. 2019 मधील विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रचंड घडामोडी घडत राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आली. या सत्तेत कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील यांना लॉटरी लागली. ते सहकार मंत्री झाले. त्यानंतर काही महिन्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक लागली. सोसायटी गटातून तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी नशीब आजमावण्यासाठी थेट कॉंग्रेसचे नेते उदयसिंह पाटील - उंडाळकर यांना विरोध दर्शविला. त्यामुळे ही निवडणूक प्रचंड चुरशीची झाली. बाळासाहेब पाटील विरुद्ध उदयसिंह पाटील या लढतीत ना. बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यात एक अलिखित 'पैरा' होत बाळासाहेब पाटील यांनी गुलाल उधळला. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा लढती पाहायला मिळाल्या. मात्र कराड उत्तर व कराड दक्षिण मधील या लढती फक्त कागदावरच तशा होत्या. प्रत्यक्षात उत्तर मध्ये उदयसिंह पाटील यांना तुतारी फुंकण्यात रस नव्हता; तर दक्षिणेत जिल्हा बँकेतील तो 'पैरा' फेडण्याची वेळ बाळासाहेब पाटील यांच्यावर आली. 'पैरा' फेडण्याचे अचूक टाइमिंग साधत उत्तरेतील घडामोडींचा राजकीय बदला घेण्याची आयती संधी बाळासाहेब पाटील यांना आली. त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अतुल भोसले यांनी बाळासाहेब पाटील यांची साथ दिली; तर विधानसभेत बाळासाहेब पाटील यांनी डॉ. अतुल भोसले यांचे हात मजबूत केले. या दुसऱ्या घडामोडीनंतर बाळासाहेब पाटील यांचा पराभव झाला मात्र एकमेकांचा पैरा फिटला. त्यानंतरची कराड नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक होऊ घातली आहे. या धामधुमीत निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपने आपले फासे टाकायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा शिंदे गट त्यानंतर जनशक्ती आघाडी भाजपात घेत असतानाच आमदार अतुल भोसले यांनी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडील टिपलेला एक 'मोहरा' लोकांच्या नजरेआड राहिला नाही. त्यातच बाळासाहेब पाटील यांचे शहरातील काही समर्थकांना पालिकेच्या पार्श्वभूमीवर 'कमळा'चा लळा लागल्याचे दिसते आहे. कृष्णा नाक्यासह वाखानात लागलेले काही बॅनरही हे पुढील घडामोडी ओळखण्यासाठी पुरेसे आहेत.मंगळवारी मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात कराड दक्षिण चे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कराड पालिकेतील अनेक मान्यवर नेते, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतले.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात गत दोन दशकांहुन अधिक आपले राजकीय वर्चस्व राखून आहे. जनशक्ती आघाडीने यंदा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसाठीही धक्कादायक असून एकेकाळी या दोन्ही पक्षांशी जवळीक असणार्या जनशक्तीने यावेळी मात्र भाजपशी हातमिळवणी करीत कराडच्या राजकारणात ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीतील राजकीय गणीते बदलणार आहेत. गत काही महिन्यात भाजपशी वाढलेली जवळीक पाहता जनशक्ती कमळ हाती घेण्याचे संकेत मिळत होते. अखेर मागील आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब झाले आणि जनशक्तीचा भाजप पक्षप्रवेश पार पडला. जनशक्तीचा हा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सोमवारी दुपारीच जाधव कुटुंबीय व त्यांचे मोजके समर्थक प्रवेशासाठी मुंबईकडे रवाना झाले. रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, नामदार चंद्रकांत पाटील व आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीमध्ये कराडच्या राजकारणावर चर्चा झाली. मंगळवारी दुपारी अधिकृतपणे जनशक्ती आघाडीने हाती कमळ घेतले. कराड शहराचे विकासाचे हित आणि लोकभावना विचारात घेवून आज भाजप प्रवेश केला आहे. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड शहरासाठी भरपूर निधी दिला आहे. त्यामुळे शहराचा विकास देखील झपाट्याने होत आहे. शहराचा विकास हाच आमचाही ध्यास आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला गती देण्यासाठी भाजपसारख्या राष्ट्रीय प्रवाहातील पक्षात जाऊन शहराचे हित साधण्याचा आमचा मानस असल्याची प्रतिक्रिया जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरूण जाधव यांनी पुण्य नगरीशी बोलताना दिली.
यांच्या हाती कमळ
कराड पालिकेतील माजी नगरसेवक व जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, माजी नगराध्यक्ष अशोक भोसले, माजी नगरसेवक आनंदराव पालकर, नगरसेवक शिवाजीराव पवार, माजी नगरसेविका चंदाराणी लुणीया, जनशक्ती आघाडीचे उपाध्यक्ष अतुल शिंदे, माजी नगरसेवक विनायक विभुते, आशुतोष जाधव, माजी नगरसेविका अरुणा शिंदे, कापड असोसिएशनचे अध्यक्ष रमेश लुणिया यांनी यावेळी भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला.
0 Comments