प्रभाग चारमधून सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील यांच्या पत्नी शैला पाटील रिंगणात
कराड - येथील पालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना शिंदे गटाने प्रचाराचा नारळ फोडला. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिंदेसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक रणजीत पाटील यांच्या पत्नी शैला पाटील यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पालिका निवडणुकीसाठी प्रत्यक्ष प्रचार सुरू करणार्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या असून घरभेटी देत त्या मतदारांशी संवाद साधत आहेत.
शहरातील प्रभाग चारमधील राजाराम पार्क परिसरात दत्त मंदिरामध्ये शैला पाटील यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला. अद्यापही पालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. आघाड्या तसेच पक्षांचीही घोषणा झालेली नाही. मात्र, तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या रणजीत पाटील यांच्या पत्नी शैला पाटील यांनी शिवाजी हाउसिंग सोसायटी प्रभाग चारमध्ये प्रचार सुरू केला. रणजीत पाटील यांनी प्रभाग चारमध्ये अनेक रस्त्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून कोट्यावधींचा निधी आणला आहे. याच प्रभागात लिबर्टी मैदानावर ‘इनडोअर स्टेडियम’साठीही त्यांनी निधी आणला आहे. या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जाती आरक्षण आहे. रणजीत पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत.
पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यानुसार या प्रभागातून रणजीत पाटील यांच्या पत्नी शैला पाटील या शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तसेच आघाड्या आणि पक्षाची घोषणा होण्याची वाट न पाहता त्यांनी प्रचार सुरू केला. शिवाजी हाउसिंग सोसायटी परिसरात त्यांनी घरोघरी मतदारांच्या भेटीही सुरू केल्या आहेत. त्याबरोबरच रणजीत पाटील हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असून शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे.
......................................
0 Comments