कराडमध्ये २८ एप्रिलला आयुष्यमान-आभा कार्डसह मोफत आरोग्य तपासणी शिबिर
युवानेते दिग्विजय डुबल यांचा उपक्रम; नागरिकांना मिळणार एकाच छताखाली सुविधा
कराड : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने कराड येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिग्विजय संभाजीराव डुबल व मित्र परिवार, कराड यांच्या वतीने मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी हे शिबिर होणार आहे.
हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कराड नगरपरिषद शाळा नं. ११, डुबल गल्ली, कराड येथे पार पडेल. या शिबिरात एकाच वेळी चार महत्त्वाच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अशी माहिती युवा नेते दिग्विजय डुबल यांनी दिली.
*काय मिळणार शिबिरात?*
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात PM-JAY अंतर्गत आयुष्यमान कार्ड काढून दिले जाणार आहे. या कार्डद्वारे पात्र कुटुंबांना प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार देशातील अंगीकृत रुग्णालयात मोफत घेता येतात. गंभीर आजारांच्या उपचारासाठी ही योजना वरदान ठरली आहे.
त्यासोबतच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आभा कार्ड म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट तयार करून दिले जाणार आहे. या कार्डमुळे नागरिकांचे सर्व लॅब रिपोर्ट्स, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, डिस्चार्ज सारांश व डॉक्टरांच्या भेटींची माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी सुरक्षित राहते. देशात कुठेही उपचार घेताना जुने रिपोर्ट्स शोधण्याची गरज पडत नाही.
याशिवाय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासाठी मतदार SIR मॅपिंग करण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध असणार आहे. नाव, पत्ता दुरुस्ती किंवा नवीन नाव नोंदणीसाठी नागरिकांना याचा फायदा होईल.
*महिला व ज्येष्ठांसाठी विशेष मोफत तपासणी*
शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यात ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाढत्या वयात आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होऊ नये व महिलांनी नियमित तपासणी करावी, या उद्देशाने ही सुविधा दिली जात आहे. अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे.
*हे सोबत आणावे*
शिबिराचा लाभ घेण्यासाठी येताना नागरिकांनी आधारकार्ड व त्या आधारकार्डशी लिंक असलेला मोबाईल सोबत आणणे बंधनकारक आहे. ओटीपी पडताळणीसाठी मोबाईल आवश्यक असल्याने नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
कराड शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांचा व मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन दिग्विजय संभाजीराव दु
डुबल व मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी अनेक सुविधा मिळत असल्याने नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे.
0 Comments