कराडच्या पालकर शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात
कराड/प्रतिनिधी - अनुसया काशिनाथ पालकर आदर्श शिशु विहार, कराड येथे बुधवार दि. २९ रोजी गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात बालवाडी विभागाच्या सहशिक्षिका कविता कानापडे यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व, व्यासपौर्णिमेची परंपरा तसेच गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान याविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले.
आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडील आणि गुरु यांना देवतुल्य स्थान असून, आई-वडील जन्म देतात व संगोपन करतात, तर गुरु ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करतात, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पूजन करून त्यांना नमस्कार केला व आशीर्वाद घेतले. विद्यार्थ्यांनी मातृपूजनातून आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहशिक्षिका कविता कानापडे, वैशाली वास्के, स्वप्नाली जाधव तसेच कर्मचारी लक्ष्मीबाई रोडगे आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments