अंतवडीचे बाधित शेतकरी - प्रशासनाची बैठक निष्फळ

अंतवडीचे बाधित शेतकरी - प्रशासनाची बैठक निष्फळ
कराड / प्रतिनिधी - अंतवडी (ता. कराड) येथील निसरे ते मायणी या रस्त्याच्या कामात जमिनीचा रितसर ताबा न घेता आणि कोणताही मोबदला न देता प्रशासनाकडून सुरू असलेल्या मनमानी काम अंतवडीचे शेतकऱ्यांनी बंद पडले आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यात शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ही बैठक निष्फळ ठरली. बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने शासन शासनाचे काम करेल मात्र आम्ही आता न्यायालयीन लढाईसाठी सज्ज झालो आहोत असे शेतकऱ्यांनी सांगितले. निसरे-मायणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यात जात आहेत, त्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. जमिनीचा ताबा (कजाप) घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच कंत्राटदाराने काम रेटून नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला असता, संबंधित बांधकाम अभियंता आणि ठेकेदाराने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याऐवजी उद्धटपणे वागणूक देत अरेरावी केली, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. हे बेकायदेशीर काम अंतवडीतील शेतकऱ्यांनी काही दिवसापूर्वी बंद पडले आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या उपस्थितीत सोमवारी त्यांच्या दालनात विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम कराड उत्तरचे अभियंता श्री धुमाळ, मसूर पोलीस ठाण्याचे प्रभारी, अंतवडीचे ग्रामसेवक, तलाठी, रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले, मात्र प्रशासन आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. उलट अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच अनावर झाला. हक्काच्या जमिनी जात असताना आणि त्याचा कोणताही मोबदला मिळत नसताना प्रशासनाचे हे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या अन्यायकारक कारभाराविरोधात आता लोकशाही व न्यायालयीन मार्गाने लढा देण्याचा निर्णय अंतवडीतील शेतकऱ्यांनी घेतला आहे. चौकट सामूहिक आत्मदहनाचा इशारा बांधकाम विभागासह प्रशासन व ठेकेदाराकडून अन्यायकारक पद्धतीने रस्त्याचे काम सुरू असून बाधित शेतकऱ्यांचा कसलाही विचार केला जात नाही. आज यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदारांनी बैठक बोलावली मात्र, ती निष्फळ ठरली. शेतकऱ्यांनावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध 26 जानेवारी रोजी बाधित शेतकरी एकत्रित येऊन आत्मदहन करणार आहोत। यासंदर्भातील निवेदन दोन दिवसात संबंधित विभागाला देण्यात येणार असल्याचे बाधित शेतकरी सिद्धनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments